कविताताई -ह्रदयात काव्य घेऊन अवतरलीस तू.
आयुष्याचा सारीपाटही मांडलासंच की.
चार चौघात उठबस तुझीही होती गतीप्रमाणे,
मात्र माणुसणं जपण्याचं गमक जणू तूच ओळखलंस.
किती ती समंजसपणाची खूणगाठ बांधलीस कायमच,
कुठून गं तू बांधलीस एवढी असाधारण हिम्मत.
तू होतीस किती निर्भिड नि धीरोदात्त नेहमीच,
तूझे लिखाण होते परखड नि सुस्पष्ट सतत.
स्वयंभू नि अथांग विस्तार होता तुझा,
अनंत आयामात उजळत प्रकटलीस तू.
एकटीच किती अफाट बरसलीस तू साहित्य आवेगात,
पाझरलेस सातत्याने अगणित शब्द-लेखाचे झरे.
किती संपन्न नि निष्णात होतीस तू शब्दसंपत्तीने.
शब्दसागराला कह्यात ठेवायचीस लीलया तू.
त्यांना एकटीच आदेश द्यायचीस ना हूकूमाने
तेव्हा भिरभिरत येऊन बसायचे शब्द रांगेत कविता बनून.
सरसर मारायचीस तू रंगांचे अनेक फटकारे.
उतरायचे उन्नत लक्षवेधी चित्र आपसुकच.
तू जगत होतीस किती गं सहजपणे.
एखाद्या तूच निर्मित केलेल्या अगम्य शब्दचित्रांगत.
एक स्वाधीन केंद्र होतीस तू-
अनेक वादळी झंझावातांचे.
पण किती सुंदर नि मुक्त-
संयमित व्यक्त व्हायचीस तू.
तू किती श्रीमंत होतीस मनाने नि वृत्तीने
सरस्वतीचा वरदहस्त होता तुझ्यावर,
आणि जमिनीवर कणखरपणे पाय रोवूनही
आकाशाची उत्तुंगता पार केलीस तू.
तुझं नसणं सोसणं असह्यच होऊन गेलंय गं,
कितीदा गं रितं होत रहायचं आता.
आमच्या आटलेल्या आंतरिक झ-यांना आता
कोण ओतप्रोत भरेल प्रेमसागराने.
कसा क्षणभरात निरोप घेतलास गं,
एकदाही मागे वळून पाहिलं नाहीस.
किती गं अर्थपूर्ण नि अमोघ होतं तुझं वक्तृत्व,
नि आता निःशब्दतेच्या गर्तेत एकटेच टाकून गेलीस.
कविताताई, अनाहूतपणे शांतावलीस कायमची आता.
थोडं स्थिरावली असतीस की गं आता तरी पण
थांबलीच नाहीस.
जरी अनंताचा प्रवास सुरू केलास निमूटपणे
सहस्त्र सूर्याला काळोखाची भिती नसतेच मुळी.
तू तुझ्या छोट्या आयुष्याच्या कॅनव्हासवर
जसे विविध पोतांचे नि आकारांचे विचार खरडले,
नानाविध प्रश्नांच्या लडी सोडवल्या अथवा ओलांडल्या
काही प्रश्नोत्तरं काळाच्या पडद्याआड गेली.
पण काही उत्तरांसाठी मात्र अजब रसायन असणारी तूच हवी
होतीस, आ वासून उभं
असणारं वास्तव तुझं नसणं अधोरेखित करतंय,
पण तुझं नसणं आमच्या असण्यात उरेल.
काही विचार नि लढे संपत नाहीत
आणि ते इतरांच्या नसांतून वाहत राहतात
पूर्णत्वास जाई पर्यंत....
No comments:
Post a Comment