Friday, December 15, 2023

स्वतंत्रतेची किंमत


सर्व नियम सहज ओलांडून

मी तुझ्यापाशी आलो.

स्वतंत्रतेच्या महान तत्वाची

ओळख अधरपणे झाली मला.



सर्वव्यापी प्रेमानं मला असे

काही लपेटलं की मला जाणवला

माझाच विस्तार कक्षांपलिकडचा

अव्याहतपणे होत जाणारा.



माझा स्वयंपूर्णतेनं अल्हाद निर्मिला कधी तू

हे कळालंच नाही मला.

कधी तुला काही द्यावे म्हटलं

तर तू अगदी निरिच्छ आभाळासारखी.



माझे दोन्ही हात तुला 

काहीही देण्यासाठी फारच लहान पडताहेत.

त्यातच तू एकटीच अनाकलनीय 

मार्गावरुन जावू इच्छितेस.



तुला थांबवण्याचे बल क्षीण होतेय

माझ्यापासून दूर तू पावले टाकत 

पाठमोरी  चालते आहेस कायमची 

नि मार्ग, दिशा यांचा  कोलाहल

माझ्या मनात दाटतो आहे.



उच्चारलेले शब्द ओठातच आडकताहेत

माझ्यापुढे आहे अनंताचा प्रवास तुझ्याविना.

पण हीच का आहे आपल्याला 

मोजावी लागलेली स्वतंत्रतेची किंमत?


2 comments:

  1. खूप छान कविता. देऊ पाहण्याची तीव्र इच्छा आणि तरीही न देता तूटत हातातुन निसटत जाणारी गोष्ट याची खंत जाणवली.

    ReplyDelete

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...