आठवणी केवळ साठवता
येतात मनात खोलवर
सरत नाहीत त्या- खरं तर
वाढतच जातात काळागणिक!
कधी आठवणी बहरतात
मधुमालतीच्या झुंबरांप्रमाणे
उजळतात त्या मनातल्या
मनात फुलत फुलत पुष्कळ
कधी आठवांच्या फुलांचे
झुबके डवरतात अवचित
पळसाच्या तेजाळलेल्या केशरी
गुच्छांगत लखलखणारे
येतात आठवणी पांढ-याशुभ्र बुचाच्या
विलग फुलांगत- मोहक पण मनवेधी
तरी काही महकलेल्या क्षणांपासून
दुरावा जाणवतो सुटून गेलेल्या
कातर नात्यांचा कायमचा
आठवणी येतात दरवळत कधी
रातराणीच्या सुगंधाप्रमाणे- मंद पण अल्हाददायक
मनाला स्पर्शून जातो त्यांचा रेंगाळणारा परीमळ
-हदयात पसरत मैत्रीगत सुखावणारा
मंद वा-याच्या लकेरींवर हळुवार
स्वार होऊन सुवासाप्रमाणे अलवार
हरवलेले आनंदक्षण उधाणत
सुखावून जातात ऐकांतात
आठवणी कधी उमलतात जाईच्या
कळ्यांप्रमाणे -कोमल नि नाजूक
मन:पटलावर कोरत जातात
बारीक नक्षी नक्षत्रांची
आठवणी ओघळतात
प्राजक्ताच्या पहाटसड्यांगत
तर कधी थबकतात त्या केशरी देठ
नि सफेद पाकळ्यांवर जडलेल्या मूकप्रेमाप्रमाणे
कधी आठवणीचा गुलमोहर
बनतो दाहक
हृदयातील ज्वालांचे
तांडव आगीने शमवतो
कधी आठवणी तेवतात मनात
प्रकाशमान दिव्याप्रमाणे उज्ज्वल
पेटत्या पलित्यांप्रमाणे
प्रकाशजाणीवा समृद्ध करतात
आठवणी सहस्ररश्मींप्रमाणे
उजळ करतात अंतःकरण
अंधारलेल्या मनात निर्मितात
अनंत आवर्तने तेजोमय
आठवणी पेरत जातात परत परत
जगलेले उदात्त क्षण
पुन्हा कधी उर्जित काळात
आपण विसावतो ते कळतच नाही
आठवणी केवळ साठवता
येतात मनात खोलवर
सरतच नाहीत त्या, खरं तर वाढतच जातात
काळागणिक सतत।
No comments:
Post a Comment