Saturday, February 3, 2024

अमूलाग्र बदल


सर्वत्र धुक्याची चादर आच्छादलेली

कितीही प्रयत्न केला तरी सर्व अंधुक

स्तब्ध आसमंतात घुमणारी शांतता

एका नव्या गूढ जगात नेणारी


मध्यरात्री सारे जग निद्रिस्त

मीच एकटा जागृत नि मौन

चांदण्यांची चादर ओढून

आकाश अथांगतेत आकंठ बुडालेले


थंड वारा मंदपणे वाहणारा 

हळूच धरतीवर धुक्याचे अस्तित्व चिरणारा

चंद्रप्रकाश सर्वदूर पसरणारा

दाही दिशा उजळवणारा


दुःखाचे अंधारी भूयार 

क्षणार्धात अंतर्धान पावणारे

समाधानाचे विस्तारीकरण

अंतरतमात वाढतच जाणारे 


रस्त्यावर गाड्यांची क्वचित चहलपहल

जणू काही अखंड निरवता क्षणार्धात कापणारी

रात्रभर पक्षी झाडांवर विसावलेले 

अवचितपणे साद घालत लक्ष वेधणारे


पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी जीवन प्रकाश

मनसृष्टीच्या कणाकणात रुजणारा सहजपणे

त्यातून निर्मित होतात प्रकाशगाणी

जी भेदतात आत्मधरेला आनंद किरणांनी


माझा प्रवास अव्याहतपणे चालणारा

श्वासागणिक पुढेच सरकणारा

मार्गक्रमणातील अडथळे सारत

आकाशाला गवसणी घालणारा 


तम ते प्रकाश हा तसा कठीण प्रवास 

पण आपणात अमूलाग्र बदल घडवणारा

नव्याने जीवनास परिपूर्ण करणारा

ह्रदय केंद्रात परिवर्तन आणणारा


No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...