Friday, December 15, 2023

अंतरतमातील अवकाश


अरेरे! आजूबाजूला किती विराट अराजकता आहे!!!

तरीही प्रत्येक सुंदर मनाला प्रगाढ शांततेचीच ओढ आहे.

शारिरीक संवेदनांचा आधार घेत अनित्यता जाणणे 

म्हणजेच स्वतःत समूळ परिवर्तन करणे .


आपण ती प्रत्येक कृती विचारपूर्वक निवडावी

जी आपल्या हृदयाला नितांत शांत करते.

जेव्हा आपण अविचाराने घेरले जातो,

तेव्हा आपल्या विश्वासाच्या विलक्षण दृढ अशा आंतरिक 

आवाजातून अधिक निरवता र्निर्मित होऊ द्यावी.


मी मानवतेच्या दुःखमुक्ततेचे अस्तित्व साजरे करतो.

त्याने माझ्या अंतरतमात अमर्याद प्रेम उचंबळत राहते.

मला क्षणभरात आजूबाजूचे स्वार्थी जग 

आणि त्याच्या तीव्र वेदना यांचा विसर पडतो.

नि मी वर्तमान क्षणात स्वत:ला सृजनतेत झोकून देतो.


सर्वांसाठी प्रत्येक क्षणी शरीराचा नाश सुरू झाला आहे.

हे क्षणभंगूर शरीर म्हणजे प्रत्येकाला 

भाड्याने मिळालेले मर्यादित अस्तित्व आहे.

म्हणून कोणाशीही वा कशासाठीही असणारी आपली

आसक्ती अगदीच व्यर्थ आहे.


प्रीतीने ओथंबलेल्या सरलतेने आपल्या 

जुन्या क्लिष्ट स्वार्थी सवयींपासून मोकळे होऊ या.

आपण शरीर, मन आणि काळाचे गुलाम आहोत.

ते अडथळे ओलांडण्याचे धाडस करूयात.


उदयव्ययातून आलेली सखोल समजेची 

झलक आधी क्षणभर येऊ शकते.

नंतर सतत जागरूकतेने आणि मनाच्या 

समतेने ती दिर्घकाळ टिकते.


चला दयाळू आणि निःस्वार्थी होऊया.

मग आपण पलिकडच्या किनाऱ्यावर नक्कीच पोहोचू .

नि मग आपण तुलना आणि द्वैतात अडकणार नाहीत.

तेव्हाच ‘अ-मना’ मध्ये - अद्भुत तेजस्वी कमळ फुलेल.


पीसी: Google images आणि फेसबुक

कॉपीराइट ©2023, डॉ. अमित मेढेकर. सर्व हक्क राखीव.

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...