रुजतंच नसतं मनांत काही
तू गातेस जीवनगीत
तेही ऱ्हदया पर्यंत पोचत नाही
तू हाक देतेस मोठ्याने
ती ही हवेतच विरून जाते
रुजतंच नसतं मनांत काही
तू खूप बोलत राहतेस
तेव्हा निशःब्द व्हायला होतं
तू खळाळून हसतेस
मी मौनच राहतो
रुजतंच नसतं मनांत काही
तू प्रेम उधळत जातेस
स्वतःसाठी काहीच मागत नाहीस
परतफेड म्हणून- प्रेम सुद्धा
त्या माझ्या कोरडेपणावर मनातल्या
मनातच मीच कोरडे ओढतो
रुजतंच नसतं मनांत काही
तू म्हणजे जीवन चैतन्य असतेस
जणू खळाळता झरा
तू निरागसपणे पसरत जातेस
तुझ्या मनातील चंद्रप्रकाश
जेव्हा मी विझत जातो अंधाराप्रमाणे
रुजतंच नसतं मनांत काही
कारण जेव्हा तू शोधतेस
सर्जनशीलता म्हणजेच ओतप्रोत जीवन
तुला जाणवतो जीवनप्रकाश
मला जाणवते मृत्यूची गडद छाया
कदचित अनेक युगांनंतर
अचानकच रुजू पहातं मनांत काही तुझ्यामुळेच
तेव्हा क्षणार्धात प्रेमसत्य बीज रुजतं
माझ्या ह्रदयात जीवनानंद नि मृत्यूदंशा पलिकडलं
नि तेव्हापासून मी चालतो अखंडपणे
काल तीरा पलिकडे
नि सुरू रहातो जीवन-मृत्यू पलिकडील मुक्त-प्रवास
सत्य सूर्याच्या प्रकाशात तुझ्यामुळेच !!!
No comments:
Post a Comment