सहज स्वतःच्या कक्षा रुंदावत जातात
जेव्हा उडताना लागत नाही आकाशाचा थांग
तरीही संपत नाही अधीर आस
रिते न होणाऱ्या अनंताला कवेत घेण्याची
पक्ष्याला जेव्हा आधी नाही जाणवत स्वतःच्या
पंखांमधले असीम बळ नवी उंची गाठतानाचे
नि अचानक होते जेव्हा प्रथमच ओळख स्वक्षमतांची
नकळत अफाट विश्व बनते
एक छोटेसे सीमित अस्तित्व
सप्तरंग मनोकाशात विखुरतात दिमाखात
तेव्हा ज्ञानआयामांचे अनेक रंग देतात प्रकाशबोध!
रंगीबेरंगी धाटणीने मनःपटल उजळवत
स्वतःच्याच नानाविध कंगोऱ्यांना सहजी स्विकारणारे!
कुठूनसा काळा ढग आकाशातून मार्गस्थ व्हावा
आणि त्याच्या मागे दडलेला विराट सूर्य मुक्त व्हावा
तशीच होते माझी सुटका क्षणार्धात लौकिकातून
आणि अव्यक्तातात प्रकाशमान होतो माझा गूढ अंतरंग
चमकून जावा वीजेगत लकाकणारा लख्ख विचार
तसे शीघ्र जागृत होतात इंद्रिय स्वबोधाने
त्यातच मी होतो मौन नि स्थीर या प्रगाढ गतीत
विस्तारणाऱ्या प्रकाशगंगा हदयात साठवत!
No comments:
Post a Comment