मी मनाचे कप्पे
बंद करुन ठेवले आहेत
त्यातील अवकाश फक्त
तुझ्याच आठवणींनी व्यापला आहे
तुला माहित नसेल हे
प्रत्येक येणारा श्वास
शरीरभर पसरतो तेव्हा
तो तुझेच गाणे गात असतो
तुला माहित नसेल हे
तुझ्याच विचारात रमत असताना
लवणारी पापणी सुद्धा
सतत तुझेच चिंतन करते
तुला माहित नसेल हे
माझ्या शरीरावरील प्रत्येक पेशी
तुला बघताच झंकारुन उठते
नि डोळ्यातून सूर्यकिरणे पाझरू लागतात
त्यानेच संपूर्ण विश्व प्रकाशमान होते
तुला माहित नसेल हे
तुझे नसणे जेव्हा अश्रूंचा
पूर होवून समुद्र बनते
तेव्हा किना~यावर आदळणाऱ्या लाटा
सतत तुझेच नामस्मरण करतात
तुला माहित नसेल हे
जेव्हा तु खळाळून हसतेस
नि माझे कान तो नाद प्राशन करतात
तेव्हा पक्षांचा कोलाहल सर्वदूर पसरतो
आणि झाडांची सळसळ आसमंतात विरते
हे सारे मी अनुभवतो तर्कापलिकडले
पण तुला माहित नसेल हे...
No comments:
Post a Comment