Friday, December 15, 2023

निर्मिती



कधी कविता माझ्याकडे येते

आपसूक येणा~या श्रावणसरींगत

तर कधी स्वाधीन मृदगंधाप्रमाणे उधळत

नि उजळून टाकते ओसाड मनाचे उंबरठे

लख्ख प्रकाशकिरणांगत


कधी कविता माझ्याकडे येते

मनोमय लकेरींच्या प्रसन्न आचरणागत

तर कधी उफाळत्या सागरलाटांच्या आव्हानाप्रमाणे

नि व्यापून टाकते माझ्या व्यक्तित्वाला

जसे आकाश धरेला


कधी कविता माझ्याकडे येते

नाचत थिरकत गिरक्या घेत

तर कधी प्रखर उन्हातील सावलीगत

किंवा प्राण ओतते काजळलेल्या जीवनज्योतीत

जसे पूर्ण चंद्र ओततो अमृत आसमंतात


"प्रिये" कधी हीच कविता

तुझ्यागत माझ्याकडे येते

जीवनविनाशी वादळ बनून

नि उखडून टाकते सर्व निर्मिलेल्या

कलाकृती क्षणार्धात



देवून जाते उरलेले निर्गुणी श्वास-

आठवणी जपण्यासाठी

कोण जाणे माझ्यापुरती

ती नकळत एक प्रगल्भ सुरुवात असू शकते

बावनकशी सोनसळी कवितेच्या निर्मितेची

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...