Friday, December 15, 2023

काळ।।।


काही वेळा आपण भविष्याचा विचार 

करता करता  मनात घोळणाऱ्या

नकारात्मक प्रभावाला

कमी करण्याचा प्रयत्न करतो।।। 



कधी जाणवत राहतात भूतकाळातील 

घटनांचे पडसाद कधी अंगावर

शहारे आणणारे तर कधी बेफाम 

वेगाने आयुष्याला सर्व बाजूंनी वेढणारे।।। 



वीजेच्या वेगाने येतो वर्तमान 

अनेक प्रकारची आव्हाने  घेऊन एकाच वेळी 

आणि आपण मोठ्या हिमतीने झेलतो 

त्यांना निधड्या छातीवर क्षणोक्षणी।।। 



आपण होतो कणखर कालपरत्वे आणि 

साहतो शरीरावरील जखमांचे खोल व्रण  

मनावर अचानक झालेले तीव्र आघात

झेलता झेलता।।। 



शोध घेत असताना नाही सापडत काळाच्या 

नागदंशावरचे परीणाम कारक उतारे।।। 

आपण चालत राहतो खडतर वाट

खडे टोचत राहतात पावलागणिक।।। 


भूत, वर्तमान आणि भविष्याचे  क्षणमणी 

काळाच्या  दोऱ्यात  ओवलेले- तुटतात नि कोसळतात 

एका मागोमाग एक तत्परतेने।।। 

जशी प्राचीन किल्ल्याची  बुरूज वा तटबंदी 

अचानक ढासळत रहावी सतत तशीच 

प्रयत्नपूर्वकही न थांबवता येणारी।।। 



आपण कदाचित शोधत राहतो 

आयुष्याची विविधांगी अर्थपूर्णता-

अपूर्णत्वात समाहित झालेली।।। 



तरी मागे उरतो फक्त वेडावाकडा 

ढाचा उलटापालटा तुटलेला-

क्षणभंगुर काळाचा।।। 


मानवाची असीम ताकद निष्प्रभ ठरते

निसर्गाच्या अनंत आयामांना मुठीत ठेवण्यासाठी।।।

मृत्यू आ वासून उभा असतो

प्रत्येकासाठी निश्चितपणे कालौघात।।। 

आज नाही तर उद्या-

तुझ्यासाठी वा माझ्यासाठी-काळ बनून।।।

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...