Thursday, December 14, 2023

रहस्य



कधी आपण जेव्हा अट्टहास करतो

अथांग आभाळाशी दोन हात करण्याचा

तेव्हा आपणास जाणवत नाही आपली क्षुद्रता

नि त्याची निर्हेतुक असीमता


कधी आपण जेव्हा साहतो रूतणारे दुःख 

नि सहन नाही होत त्याची व्याप्ती सहज

तेव्हा आपण होतो अचंबित 

आभाळाच्या संयमीपणा नि अव्यक्त गहराईने


जेव्हा आपण सोडतो एक प्रथम उसासा 

जीवनाच्या हताश मर्यादेवर

तेव्हा जाणवतो निर्भय आभाळाचा 

अमर्याद एकटेपणा


कधी आपण  एकांतात जाणतो

जीवनातील दाहक अव्यवस्था

तेव्हा प्रथम कळतो 

आभाळाचा मुक्त मौनीपणा


कधी आपण समजू शकतो

ह्याच रित्या आभाळाचे रहस्यमय बापपण 

तेव्हा आणि तेव्हाच कदाचित उलगडू शकते

आपणास आपल्याही बापाचे

आभाळपणाचे रहस्यही..

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...