सर्वत्र निरवता दूरवर पसरते।
पाचूच्या पानांवर दवबिंदू चमकत राहतात।।।
पहाटे गूढ विरळ धुके सगळीकडे दाटून राहते।
सूर्य किरणांचा मागमूस मात्र नावालाही कुठेच दिसत नाही।।।
वा-याची मंद झुळूक मनाला मोहवते।।।
पक्ष्यांचा गूढ किलबिलाट आसमंत उजळून टाकतो।।।
त्यातच कोकिळेच्या सुंदर तानेने भान हरपते।।।
चिमण्या चिवचिवाट करत आनंद विखुरतात सर्वत्र ।।।
सकाळीच अचानक पावसाची सुखद सर येते।
खोल अंतर्मनातील मळभ दूर होते।।।
त्यातच विराट आकाश निरभ्र होते।।।
मनोकाश स्फटिकासारखे आरपार,शुद्ध नि शुभ्र होते।।।
निर्मळ आसमंतात गुलमोहोराचा बहर दिव्य भासतो।
आमलताश आपल्या सहज विस्ताराने लक्ष वेधतो।।।
प्राजक्ताच्या चांदणफुलांचा सडा अल्हाद निर्मितो।।।
टपोर मोगरा सुगंधाची शिंपण करतो।।।
असीम ब्रह्मांडदेह आपला अफाट
विस्तार पेलत निसर्ग शक्तींवर अधिसत्ता गाजवतो।।।
स्तिमित मानव विस्मयचकित होत
विश्वनियमाच्या जीवन दायी स्त्रोताचे
अखंड गुणगान करत राहतो।।।
No comments:
Post a Comment