Thursday, December 14, 2023

काळप्रतल!!!



जगण्याची परिभाषा जोपर्यंत स्वकेंद्रित असते

तोपर्यंत आपण वैयक्तिक गृहीतकांकडे खेचले जातो। 

आपली सुखदुःख तीव्र आणि अणकुचीदार वाटत राहतात।


पण जेव्हा आपण आपल्या ठिसूळ प्रतिमांना ओलांडतो। 

तेव्हा प्रथमच आपण जीवनाचे समग्र दर्शन घ्यायला पात्र 

ठरतो।।। 


क्षणिक सुखामागे धावता धावता आपण 

अक्षय्य आनंदाला मुकतो।।। 

पोटापाण्याची खळगी भरता भरता आला 

दिवस कसा निसटून जातो तेच कळत नाही।।।


सूर्य कधी उगवला, अंतर्धान पावला याचे 

काहीच मोजमाप  नसते आपल्याला।।। 

पहाटेचा थंड वारा कधी अनुभवू 

याची  भ्रांत नसते  आपणाला। 


केवळ वय वाढत नसते किंवा जीवनातला 

एकेक दिवस कमी होत नाही। 

तर आपल्या आयुष्यातील 

संधी कमी होत जातात।। 


आपल्या शक्यतांचा विस्तार 

आपणच करायचा असतो। 

एकदा हे जाणले की आपली 

कृतीच सर्वाधिक महत्वाची ठरते।।। 


आपण नव्या मितींना कवटाळून घेतो नि 

नव्या आव्हानांना लिलया सामोरे जातो।।। 

त्यातच आपला आंतरिक सूर्य उगवतो। 

नि आपणच आपल्या मनोआकाशास गवसणी घालतो।।। 


लोप पावणा-या काळावर आरूढ होताना

आपणासही उमगतो आपला दिव्यपथ।।। 

चालता चालता आपण ध्यास घेतलेल्या 

मुक्कामी  पोहोचतो नकळत 

काळप्रतलावर आपले ठसे उमटवत।।।

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...