Thursday, December 14, 2023

दृष्टी!!!




तुझ्या निमित्ताने मी माझ्याकडे पाहतो

मला दिसतात असंख्य बदलत्या प्रतिमा

नवनवीन नाती, नवे मैत्र,

आयुष्यातली अगणित गणितं, अनंत प्रेम,

स्वानुभवाचे खाचखळगे, अनुबंधाची दृढता.


तुझ्या निमित्ताने मी माझ्याकडे पाहतो-

अनुभवतो आकाशभर आनंद ,नदीभर तहान,

समुद्रभर द्वैताचे अश्रू, फ़ुलांची कोमलता,

तर कधी हिऱ्याची कठिणता,

सोन्याची चकाकी, मोत्याचे सौंदर्य.


तुझ्या निमित्ताने मी माझ्याकडे पाहतो-

जाणवते प्रदिर्घ स्वातंत्र्य, मुठभर तत्वे,

विचारांची देवाणघेवाण, प्रगल्भतेची प्रमेये,

अविचाराची मोडतोड,भांडणातला तह,

उल्हासातला साधेपणा,मनाची उदारता.


तुझ्या निमित्ताने मी माझ्याकडे पाहतो-

जाणवतो पक्ष्यांचा कोलाहल,पृथ्वीची उलाढाल,

वाऱ्याची थंड झुळूक, झऱ्याची शुदधता,

प्राण्यांचा सौहार्द, तलावाची आत्मसंतुष्टता

नेमकेपणातील हिंमत, जीवनाचे संगीत,

जन्मभूमीच्या मूठभर मातीचा अखंड लौकीक.


तुझ्याच निमित्ताने मी माझ्याकडे पाहतो-

नि जाणतो माझा विस्तार

नव्याच दृष्टीने शांतवत.......

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...