Friday, December 15, 2023

वस्त्रे


जशी वस्त्रे बदलावी कैकदा

तशी बदलतात घट्ट नातीही

अर्थ काही केल्या लावता येत नाहीत

काही अर्थपूर्ण घटनांच्या तपशिलांचा



उमजते अचानकच की पिंपळपानालाही

जाळीदार बनण्यासाठी

झाडापासून विलग व्हावं लागतंच ना

तसाच आपल्या आयुष्याच्या

पिंपळपानाचा प्रवास असावा कदाचित



तुझ्यामुळेच घडलोय मी

हे नाकारणार नाहीच कधी 

तसेच तू माझ्यावरचा

अधिकार सोडून दिला आहेस कधीचाच



मी मात्र बुडालोय

त्या जुन्या भासमान सत्याच्या भोव~यात

या भ्रमात की कालचक्र उलटे फिरेल

नि आपण भेटू नवीन उल्हासाने



विणताना नात्याचा गोफ घट्ट विणेचा -

उरतातच काही नाती

जी आपल्या आत्म्याच्या पटलावर ठसतात

नि सोबत करतात जन्मानुजन्मे

एका शरीरानंतर दुसऱ्या शरीराचे

वस्त्र बदलत युगान्तापर्यंत...

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...