Friday, December 15, 2023

शोध


मोजता येतात तारखा

पण थांबवता येत नाही

काळाचा उसळता प्रवाह


शोधता येतात चेहरे आपल्यांचे गर्दीत

पण कळत नाही कधीच

आपल्यांचे आपले न होता गर्दीत मिसळणे


सागरात ओंडके एकत्र येतात

नि काही काळानंतर कायमचे विलग होतात

तसेच आपलेही एकत्र येणे आणि दुरावणे असेल कदाचित


किती तो खटाटोप आपले काही असण्या

अथवा काही नसण्या बद्दलचा

हे विसरुन की आहेत मोजकेच श्वास प्रत्येकाला

उरी आपापली सुख-दुःखं बाळगत


जगरहाटी थांबत नाही कोणासाठीच

तीळ तीळ जीव तुटत राह्तो आपला

श्वास-उश्वासाची साखळी विस्तारत जाते

आणि बंदिस्त शरीरात आपण आपल्या

आठवणी घोळवत राहतो अनाहूतपणे सतत एकटेच


आयुष्याचा थांग लागणे अवघड....

जशी वा~याची मंद झुळूक

मुठीत पकडण्याचा प्रयत्न करावा

आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटावी


अथवा प्रेमाच्या अनंत आयामांना

आपल्या बुद्धिच्या चौकटीत

बंदिस्त करण्याची गुस्ताखी करावी


नि हे सगळं जाणतो मी म्हणत

क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा सतत

तुला विसरण्याचा प्रयत्न करावा


आणि आपसूकच शोध चालू करावा

स्वतःचाच नव्याने

तुझ्या आठवणींच्या प्रकाशात...


No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...