Friday, December 15, 2023

प्रत्येकाचा सूर्य निराळा असतो



पंखात  किती  बळ आहे हे जोखायला 

भरारी घेणे आवश्यक असते. 

आकाशाच्या निळाईमध्ये समरस व्हायला

उभारी घेणे गरजेचे असते. 


आपण किती उंचीवर झेपावयाचे हे आपल्या पंखाच्या नि 

मनाच्या खंबीरपणावर ठरते.

तरीही आपणच शोधायला हवा आपला मनोविस्तार आकाश 

गंगेला कवेत घेणारा. 


इतरांना दोष देत बसण्यात जन्म घालवण्याऐवजी

स्वत:मध्ये अमुलाग्र बदल करणे श्रेयस्कर. 

परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते तेव्हा 

आतला आवाज ऐकून नीट वागणे हेच शहाणपण. 


आपण आपल्या आयुष्याचा मागोवा घेत

चुकत शिकत घट्ट पाय रोवायचे असतात. 

जे मिळाले ते आपले- बाकी गंगेच्या प्रवाहात. 

मिळालेल्या अनुभवाची शिदोरी हीच खूणगाठ. 


चुकतात रस्ते, बदलतात वाटा, काटे पायात रूततात, दिशा 

भरकटतात. 

लांबच लांब प्रतिक्षा करत वेचलेले जीवनाचे महत्त्वाचे क्षण 

निसटून जातात हातून पा-यासारखे.


वर्तमान काळात थांबत नाही काळ जास्त 

कोणासाठीच निमिषार्धापेक्षा.

भविष्यकाळाचे भूतकाळात बेमालूमपणे मिसळणे 

अव्याहतपणे चालूच राहते. 


असामान्य असते प्रतिभा प्रत्येकाची. 

तशीच प्रत्येकाची असते टोकाची आसक्ती जीवनाप्रती.

अनेक सत्गुण उजळवतात आपले अस्तित्व. 

-आपले अस्तित्व असेपर्यंत नि नंतरही।।। 


विस्तारतात क्षितिजं प्रत्येकाच्या आकाशातील. 

सूर्य जाणवतो-कधी उगवणारा, तप्त, दैदिप्यमान 

अथवा कधी मावळता, सौम्य नि उतरणीला लागलेला. 


तरीही -आपापल्या मिळालेल्या स्वआकाशात-

प्रत्येकाचा सूर्य निराळा असतो-

बुडाल्यावर पुन्हा नव्याने उगवणारा-

प्रत्येकासाठी अंतिमतेपूर्वी-श्वास असेपर्यंत।।।

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...