एकाचवेळी सतत आपण रेंगाळत रहातो
विविध प्रकारच्या विकल्पांभोवती।।।
आशा फसवी असते हे काय
आपण खरोखर जाणत का नाहीत ?
मधाच्या थेंबांभोवती अनेक माशा
घोंघावतात नि फसतात।।।
तसेच अनेक संधींच्या आकर्षणाने स्वार्थी मन
यश आसक्ती नि पैशाभोवती घोटाळत राहते।।।
निरासक्त होताना जोखू शकत नाही आपण
त्यागाची सहज वाट।।।
मान, नाव आणि श्रीमंती यांच्या विळख्यात
मिळत नाहीत मोकळे क्षण निखळ आनंदाचे।।।
येईलही आयुष्यात एखादा
अजाणतेपणी निसटता
भासमान काळाचा भ्रामक भोवरा।।।
नेईल खेचून सर्व काही आपणासोबत क्षणार्धात।।।
तरीही काढावे येथे निमूट वास्तव्य
येणाऱ्या प्रत्येक क्षणागणिक।।।
नि अस्तित्व भरून टाकावे
ओतप्रोत सुखद सर्वत्र।।।
'आपण असणे' हाच
आहे खरा जीवन-उत्सव
सृष्टीच्या कणाकणांत
सामावणारा नि प्रकाशमान।।।
शरीरातून एकदा श्वास कायमचा सुटून गेला की
अचेतन देहामध्ये केवळ अंध:काराची सत्ता चालते।।।
पूर्णविराम देणारा क्षण येऊन
ठेपण्यापूर्वी आपण व्हावे सज्ज नि सतर्क।।।
खूप लहानशा प्रवासात करावी
दीर्घ नि अर्थपूर्ण वाटचाल- निर्हेतुकपणे नि जाणतेपणाने।।।
तेवढेच आपल्या हातात होते, आहे आणि असेल।।।
बाकी सर्व काही व्यर्थ आहे।।।
No comments:
Post a Comment