Thursday, December 14, 2023

तेजस्वी कविता


माझ्याकडे कविता शब्द बनून येतात

आणि अवचितपणे आयुष्याचे आयाम बनून जातात.

अस्फुटपणे रेंगाळतात काही ओळी ओठांवर

गुणगुणत अनुभवतो मी त्यांचा लयबद्ध प्रवास


मी कवितांच्या अर्थामधे डुबकी मारतो

नकळत हाती लागतात विचारांचे शिंपणमोती 

नाही हिरावू शकत कोणीही त्यांचे

हृदयावरील अमीट अलवार कोंदण


शब्दालंकार लेऊन उजळत जातात

माझ्या कवितेच्या सौंदर्य कक्षा

मीही बनत जातो श्रीमंत त्यांच्या

अर्थपूर्ण अमाप शब्द संपत्तीने


मनःस्पंदनांना जेव्हा शब्दाचे धुमारे फुटतात

तेव्हा कविता उत्पन्न होते नकळत

मी न्हाऊन निघतो तिच्या बरसणाऱ्या

चिंब भिजवणाऱ्या शब्दसरींमध्ये!


मी आनंदून जातो कवितेच्या

विस्मयकारक प्रकटीकरणाने

नि एकटाच विसावत जातो

कवितेच्या आशयगर्भ निर्गुण अमूर्ततेत


कधी थबकतो मी अचानक

शब्दातून व्यक्त होणाऱ्या 

गूढ अनाकलनीय भावनिर्मिती मध्ये

शोधत राहतो खोलवर शब्दातीत मौनाला.


आल्या श्वासा प्रमाणे निर्मित होते माझी कविता

गेल्या श्वासा प्रमाणे पूर्णत्वास पोहोचते  तिचे क्षणिक अस्तित्व

अशा कित्येक कविता मी जगलो आहे रसरसून

आणि तरी हरवल्या आहेत कित्येक अपूर्ण कविता

सरत्या श्वासागत पूर्ण प्रकट होण्यापूर्वीच


मनातल्या आंदोलनात अर्धवट सोडलेल्या

आहेत अनेक सुंदर कविता

ज्या कधीही पोहोचणार नाहीत तुमच्यापर्यंत

पण काही कविता आहेतच मनाच्या तळाशी साठलेल्या

माझ्या सोबतच संपणाऱ्या - तेजस्वी कविता!!!

No comments:

Post a Comment

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...