कधी कधी आपण आपलेच जग
ति-हाईताच्या डोळ्याने बघायला गेलो,
तर जाणवत राहतात नवनवीन रंग आपण
न पारखलेले बहुरंगी नि बहुढंगी.
आपल्याला जाणवतो आपलाच अफाट विस्तार
स्वतःच्या हिम्मत आणि असीम ताकदीचा.
आपणही जोखतो आपल्या स्वनिर्मित
आकाशाची उंची आणि त्याचे अमर्यादपण.
नजर धावते तोपर्यंत असतो आपला कॅनव्हास
आपण चितारतो आपले विराट अस्तित्व नव्याने.
घटनांचे कोंदण बनवते अभूतपूर्व रहस्यमय चित्र
अव्यक्त नि अमूर्त जाणीवांचे प्रकटन करत.
आपण निर्मितो आपलेच जीवन-चित्र आणि
भरतो उजळ रंग सत्गुणांनी ओसंडून वाहणारे.
प्रकाशाचे पोत लिंपतो आपण विरळ्या क्षमतांचे
आणि काही कवडसे उमटतात आनंद-किरणांचे.
पण जर नसती साहिली अंधारयुगे अतीव दुःखाची
तर नसते कळाले कधीच माणुसणे,अंधारणे आणि उजाडणे,
तर नसते कळाले कारूण्य, समाधान आणि विवेक.
आणि नसते पहाता आले 'साक्षीत्वा'ने
आपल्याच समग्र जीवनाकडे निकोपपणे.
No comments:
Post a Comment