आज सहजच मागे वळून पाहिले
तेव्हा मिळालेले समाधान नि आनंदाचे क्षण
चमकले आणि विझले.
काही क्षण साठवले नि काही निसटले.
काही क्षण थांबले आणि काही थबकले.
काही विस्तारले आणि काही आकुंचन पावले.
काही क्षण मात्र आरपार ह्रदय भेदून गेले.
काही रक्त न सांडवता चिरून आणि चिणून गेले.
काही हरवले काही विखुरले.
काही ओथंबले काही अश्रूंप्रमाणे ओघळले.
आजोबांचे छत्र काळाने हिरावले.
आजीची माया हरपली.
मामा अनंताच्या प्रवासाला कायमचा निघून गेला.
मावशी अचानकच नीरवतेत शांतावली.
मामीची प्रेम-छाया अकाली विरली.
धीराची बहिण हक्काची पण हाक न देता निघून गेली.
प्रेमळ काका काकू ही कालातीत झाले.
आयुष्य प्रत्येकाला काही ना काही शिकवते.
पण त्याहून मोठा शिक्षक हा काळ.
त्याचे धक्कातंत्र अनपेक्षित नि अकल्पित.
त्याच्या राज्यात सर्वत्र अनिश्चितता.
त्याचा शेवटाचा निर्णय शेवटचा-भीषण.
परतीचा मार्ग अखेरचा नि बंद-निर्विवादपणे.
आपण मिळवलेले अनुभव ओरबाडून
एकसंध करायचे
आणि सारेच कसे अचानक इथेच सोडून चालते व्हायचे.
वळणावळणावर आघात सहन करायचे नीमूटतेनं.
जीवनाच्या अवघड घाटांवर
स्वतःचे शरीर-ओझे सांभाळायचे.
अनंत आयामामध्ये विलीन होण्यापूर्वी हेलकावायचे.
आपला लेखाजोखा अजमावत रहायचा.
तरीही आतल्याआत तुटणाऱ्या आवेगांना
ताकद नि आवेशानं सामोरं जायचं.
कोणतीही खबर न देता येणाऱ्या काळाला
अखेर आपणच कह्यात घ्यायला शिकायचे.
उत्तुंग ध्येयशिखर गाठत स्वयंभू बनायचे.
तर कधी शौर्यानं आणि धैर्यानं पुरूषार्थ करायचा.
कधीच उसंत नसताना काही मुक्त श्वास शोधायचे.
कुतरओढ सहन करतही उन्नत मार्ग शोधायचे.
आठवणी जोपासत पुढची वाटचाल करायची.
तरी जगरहाटी चालतंच रहाते म्हणत आपल्याच
ख-याखु-या कदाचित पुढच्याच किंवा कोणत्याही
क्षणी येणा-या अंतिमतेची प्रतिक्षा करायची
No comments:
Post a Comment