अनंत काळोख
आरडाओरडा करत
सांगत फिरतो सतत
की तोच आहे शाश्वत.
रात्रीचा अंधार कधी आक्रसतो
तर कधी सैरावैरा अंगावर आक्रमण करतो
त्याचा गोंगाट निनादत राहतो
दाहिदिशांमध्ये सतत.
त्याचा अहंकार घोंघावतो
प्रकाश अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटवत
भासते जणू विझणारंच नाही कधीही तो
संपणार नाहीच त्याचे अस्तित्व कधीच.
अंधार अंधपणाने चाचपडतो
आपला प्रदिर्घ पसारा
जुळवतो आपलं अंधारलेपण
विषण्ण काळोखाचं.
तरीही बदलत्या काळाबरोबर नवी गणितं
उलगडतच जातात विविध शक्यता
आणि अचानक गौप्यस्फोट करत
सत्याची प्रकाश-सत्ता कह्यात घेते
सा-या निर्मिती-कक्षा.
गुरूजी ही तुमच्या येण्याची चाहूल
आहे का कोण जाणे ...
तुमच्या प्रतिभेचे सूर्य किरण फेर धरत येतात नि
अचानक धरित्रीवरील अज्ञान तिमीराला भेदतात
मी न्हाऊन निघतो तुमच्या ज्ञानप्रकाशाने
नाही तर जणू असतो मी खीन्न
कायमचाच कालौघात
मी तयार आहे सहप्रवासासाठी-
माझ्यासारखे अनेक जण
आसुसलेले आहेत मुक्तीसाठी
तूम्हीच द्याल का प्रकाश दान सर्वांना?
याच क्षणाची वाट बघत आहे
प्रत्येक जण जणू
नव्या प्रकाशमान
मंगल विश्वाच्या निर्मितीसाठी
तुम्हीच तर हवे आहात
प्रकटवाल का तुमचा आत्मिक किरणझोत
मग तुमच्या अस्तित्वाचे सप्तसूर्य-विस्तारत
शोषून घेतील अंधार-गर्तेत कोलमडलेल्या
वैश्विक रचनेतील तमाला
नि तोडतील त्या काळोख-नियमांना सहज
कदाचित कोणासाठीही नवनिर्मिती
सहजी साध्य होत नसतेच मुळी...
नि जरी माझ्या अक्षुण्ण धैर्याने संपली असेल
माझी अनेक युगांची असीम अंधारमिती
तूम्हीही जपलंतच की तुमचं असाधारण
जबाबदार प्रकाशपण युगानुयुगे...
No comments:
Post a Comment