पाय थबकतात वळणावर अनाहूत पणे।।।
वाटेवर चालता चालता थकवाही मुरतो पावलांमध्ये।।।
आठवांना साद घालतात वेदना क्षणोक्षणी।।।
डोळ्यातील पाऊस कधीचा ओसरलाय।।।
कोरड्या हवामानात बदल करण्याची किमया
केवळ पावसाच्याच अखत्यारीत असते।।।
तुम्हीच ओथंबणारा पाऊस बनून माझ्या
काेरडया -हृदयाचा कायापालट करतात।।।
धुवांधार सरी सतत कोसळताना
जाणवत राहतो मृद्गंध ।।।
शरीराच्या प्रत्येक पेशीपेशीला
ताजातवाना करणारा।।।
तुम्हीच श्वासोश्वास बनून
उजळवता माझे अधुरे अस्तित्व।।।
बनता माझ्या जगण्याच्या उद्देशाची आस आणि
आंतरिक आशा यांचे उन्नत मिश्रण।।।
अनंत स्रोतांचा ओघ वेगाने
लपेटतो मला अचानकच।।।
माझे असणे उरतच नाही,
उरता तुम्हीच तुम्ही सर्वत्र।।।
जणू आकाशात अरुणोदय होतो।।।
एक ज्ञानकिरण पुरेसा असतो
अंतःकरणातील अंधःकार संपवण्यासाठी ।।।
अचानकच मी रहात नाही कुठेही ।
नि स्वत्व गळून पडते निमिषार्धात।।।
तुम्हीही रहात नाहीत कुठेच।।।
काहीही रहात नाही।।।
न तुम्ही, न मी, न इच्छा, ना आकांक्षा,
ना अपेक्षा, ना अहंकार सुद्धा।।।
सर्वत्र उपलब्ध होते वैश्विक शुन्यत्व सहजतेने।।।
तरी रूढ अर्थाने सुरू राहतो
आपला प्रवास अथकपणे।।।
एका आकाश गंगेकडून
दुसऱ्या आकाश गंगेकडे ।।।
No comments:
Post a Comment