मी जेव्हा नसेल तेव्हा शोधाल तुम्ही मला
सूर्याच्या प्रखर सहस्र रश्मींच्या लख्ख प्रकाशात।।।
पौर्णिमेच्या चंद्राच्या अधीर उत्कट आसमंतात।।
चांदण्यांच्या किणकिणाऱ्या धवल उज्ज्वलतेत।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
नसाल तुम्ही साक्षी माझ्या जीवनध्येयासाठीच्या
धडपडीत मी काय साहिले, पाहिले, अनुभवले।।।
तुम्हाला नसेल कल्पना त्या संपन्नजीवन धारेची,
त्या ओजस्वी आणि उत्तुंग शिखर अथक मार्ग- क्रमणाची।।
माझा प्रवास तुम्ही समजू शकणार नाहीत।।।
नंतर तुम्ही जाणण्याचा फोल प्रयत्नही कराल।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
आयुष्याचा खेळ कुणाला कळला का आहे?
काळ कुणासाठी थांबला आहे का?
प्रत्येकाचा बहर प्रत्येकाचा ऋतू संपणार आहे हे काय
आपणांस ठाऊक नाही?
जीवनाचा सारीपाट क्षणार्धात उधळून
सगळे प्यादे, वजीर, राणी, राजे शह काटशह देत शेवटाला
कवटाळणार आहेतच।।।
असण्याचे नसणे होईल तेव्हा मला
ढवळून जाऊन आठवाल।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
श्वासाचा महिमा संपणार आहे तेव्हा हा कचकडीचा खेळ
संपेल।।।
तुम्ही सैरावैरा धावत नक्षत्रांकडे माझी चौकशी कराल।।।
दाही दिशांमध्ये माझा शोध घ्याल ।।।
माझ्या अस्तित्वाचा सतत उच्चार कराल।।।
पण माझा मागमूस कुठेही सापडणार नाही।।।
तुम्ही तीव्र वेदनेने आक्रंदून निघाल।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
थोडा काळ सरेलही ।।।
काळाच्या ओघात होणारे आघातही ओसरतील।।।
माझ्या नसण्याची तीव्र वेदना तुम्हाला
सुन्न करेल किंवा तुम्हीही कठोर व्हाल।।।
जगरहाटी प्रमाणे नसण्याचं दुःखही धुसर होईल।।।
ओसरेल सुद्धा।।।
कदाचित सगळे सूर्य, चंद्र, चांदण्यांचे फेर धरून नाचणे
थांबेलही क्षणभर।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
मी नसताना तुम्ही तुमच्या असण्याची
शक्यता गृहीत धरली नसेलही।।।
तुमचं असणं माझ्या विना अपूर्ण असेलही।।।
मी आठवणीत उरेल ही अथवा नुरेलही।।।
तुम्हाला नक्की वाटेल खूप बाेलायचं राहून गेलं।।।
निदान विचारपुस तरी केली असती शेवटी
निदान "कसा आहेस?" इतके तरी।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
माझा हक्क होता तेवढा तरी।।।
न जाणो, तो ही तू हिरावून घेतलास ही
खंत तुला अस्वस्थ करेलही खरं तर।।।
त्यातच मी नसताना तेव्हा
"कसा आहेस?" या तुझ्या छोट्या प्रश्नाच्या
उत्तराची प्रकर्षाने अपेक्षा करशील ।।।
तरी माझ्या कडून काहीही नी काहीच उत्तर येणार नाही।।।
तुला लाखदा वाटेल की मी बोलावे एकदा तरी।।।
-पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
PC:Facebook, google images
No comments:
Post a Comment