सातत्याने मागोवा घेत जाताना उरतो
लांबलचक भूतकाळाचा तुकडा,
त्याच्या आठवणींचा साक्षेप आणि
त्याचा विराट प्रभाव क्षणोक्षणी
वर्तमानावर आरूढ होणारा।।।
क्षणिक पण ताकदवान काळाचा
अपरंपार महिमा आपण जाणतोच।।।
तो बदलून टाकतो जीवनाची प्रमेये
जी माणूस स्तिमित होऊन बघत बसतो।।
कालौघात अपरिहार्य असतात स्वैर
स्व-निर्मित कृतींची निमित्ते नि परिणाम।।।
काही वेगाने अंगावर धावत येतात निमिषार्धात।।।
तर काही आठवणींच्या कोंदणात
स्थानापन्न होतात कायमचीच।।।
आत्मकेंद्रित घटनांभोवती फिरतांना उसळतात आपल्या
धमन्यांमधील धगधगत वाहणारे रक्तांचे उष्ण पाट ।।।
तसेच अस्थिर करत जातात वेळोवेळी आपणाला
आपल्यातून प्रवाहित होणारे ज्वलंत विचारांचे दाहक स्त्रोत।।।
विसरता येत नाही आपल्यांचे अचानकच
कायमचे दुरावणे नि संपणे।।।
आपल्यांचे शाश्वत भासणारे पण क्षणभंगुर
असणारे अस्तित्व हेलावून टाकते आपल्याला
गडद मृत्यू-छायांमध्ये।।।
तरीही आपणच जोखले पाहिजे याही परिस्थितीत
की आपल्या 'आज' मध्येच क्षमता आहे -
रूजत वाढण्याची, आपणातल्या समूळ परिवर्तनाची,
नानाविध शक्यतांची आणि अनंत विस्ताराची।।।
आपणच शिक्कामोर्तब करावे माणसाच्या माणूसण्यावर-
कृतीशील बनून।।।
अधोरेखित करावे आपले अस्तित्व मुक्ती कडे वाटचाल
करत।।।
वर्तमान क्षणाचा शेवट हीच एक नवीन सुरूवात असू
शकते -अर्थपूर्ण नि सजग होऊन जगण्याची।।।
No comments:
Post a Comment