कधीकधी आपण आयुष्यात ऐवढे तल्लीन होतो
की आपणास बाह्य बेगडी जगाचा विसर पडतो।।।
आपण आंतरिक आनंदात बुडून जातो।।।
विविध मानसिक ताण स्तब्ध शांततेत विलीन होतात।।।
आयुष्य सुखदुःखाच्या द्वैताला ओलांडून जाते।।।
नीरवतेचा विस्तार सर्वदूर वाढतच जातो।।।
आतबाहेर असा भेद रहात नाही।।।
जे काही दिसते ते आपणच बनतो-सारे काही।।।
आपण बनतो संपूर्ण आकाश नि अवकाशही
अथवा विश्व नि आकाशगंगाही।।।
आपणच बनतो तलाव, नदी,
वृक्ष, पहाड आणि समुद्र सुद्धा।।।
कधी आपणच बनतो पक्षी,
प्राणी नि फुले वा फळे।।।
आणि आपण बनतो -ओतप्रोत प्रेम
आणि अक्षय्य आनंदसुद्धा।।।
आपण कवटाळतो विहंगम सृष्टिला नि नैसर्गिक ताकदींना ।।।
आपण चरणी लीन होतो वैश्विक शक्तींच्या।।
ओंकाराचे अस्तित्व अनुभवतो- बालकांच्या मोहक
बाललीलांत, ऊर्जा-रूपी धगधगत्या तारूण्यात आणि
सात्त्विक करूणाकर वार्धक्याच्या प्रकटीकरणात ।।।
आपण कधी निर्माण करतो अजरामर कलाकृती।।।
आपण निर्मितो सूर, लय नि तालातून आलाप, राग, टप्पा नि
भैरवी।।।
प्रकटवतो आपण कला आणि संस्कृतीचे आविष्कार।।।
आपण लिहितो विज्ञान, शास्त्र, संशोधन, नाट्य नि वाङ्मय।।।
आपण बनतो दुष्ट लंकापतीला संपवणारा मर्यादा पुरुषोत्तम
शूर धिरोदात्त श्रीराम।।।
आपणच धनुर्धारी अर्जुन बनून भेदतो फिरत्या माशाचा
डोळा।।।
आपण फोडतो पोट हिरण्यकश्यपूंचे- नरसिंह बनून।।।
आपण बनतो शिवाजी-डरकाळी फोडत -
"राज्य व्हावे ही श्रींची इच्छा" वा
बनतो मावळा गर्जत-"हरहर महादेव"।।।
आपण उत्पन्न होतो राजघराण्यात बुद्ध बनून,
जगाकडे पाठ फिरवून निघून जातो ज्ञान प्राप्तीतून
जगद्कल्याणासाठी।।।
आपणच बनतो शंकराचार्य धर्माचरण आणि
नीतिरक्षणासाठी।।।
आपणच बनतो गुरू गोविंद सिंह वा महावीर वा जीजस
प्रबोधन नि जनोद्धारासाठी।।।
आपणच बनतो स्वातंत्र्याचे प्रणेते
गांधीजी,लो.टिळक,स्वा.सावरकर,भा.आम्बेडकर, सुभाषचंद्र,
ला. शास्त्री वा वल्लभभाई!!!
आपणच गार्गी, सावित्री नी आनंदी बनून
उद्धार करतो आया बहिणींचा।।।
आपणच बनतो आई जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई
अधर्माचा संहार करण्यासाठी।।।
आपणच बनतो सरोजीनी वा इंदिरा राष्ट्रोद्धारासाठी।।।
आपणच बनतो आई, बहीण, पत्नी, सखी वा मुलगी पुरुषाला
माणूस बनवण्यासाठी।।।
आपणच बनतो - दृश्य नि अदृश्य, सगुण नि निर्गुण,भव्य नि
उदात्त- सर्व काही़- आपल्या मनःपटलावरील प्रतिमांनुसार।।।
No comments:
Post a Comment