बरेचदा आपण रेंगाळत राहतो
आपल्या आयुष्यातील
न संपणाऱ्या अपेक्षा आणि
असाध्य ध्येयांभोवती!!!
अचानक आपल्या नजरेसमोर
तरळत राहतात अनपेक्षितपणे
मिळालेले घवघवीत यश
अथवा सपशेल अपयश।।।
मोजक्या दु:ख नि आनंदाच्या क्षणांत
भूतकाळ मोठ्या कातळाप्रमाणे उभा राहतो।।।
भक्कम न हलणारे क्षण आ वासून उभे राहतात।।।
आपण पार नाही करू शकत
भविष्याचा अतर्क्य क्लिष्ट नानास्तरीय घाट।।।
नाही जोखू शकत आव्हाने आणि
संधी यांचा मिलाफ अथवा वियोग।।।
वर्तमानाचा फेकलेला तुकडा
कधी भूतकाळात भिरकावला जातो तेच कळत नाही।।।
क्षणागणिक क्षणे ढासळत राहतात
वृद्ध बुरुजाच्या तटबंदीप्रमाणे।।।
काळा मागे काळाचे चिरे
ठिसूळ होत राहतात।।।
नजरेच्या टप्प्यात सर्वत्र
आठवणींचे धुके विरत जाते।।।
तरीही योग्य क्षणी आपण
जीवनाच्या नानाविध प्रकारच्या
आयामांना गवसणी
घालतोच अचानकपणे।।।
मात्र जेव्हा आपण मनोआकाशाचा
वाढता विस्तार स्वेच्छेने
कवटाळतो तेव्हा निसर्गाच्या
अनंत ऊर्जास्रोताला कवेत घेतो अनाहूतपणे।।।
No comments:
Post a Comment