माझ्या बापा-
आकाशातून प्रकाशकिरण
तुझ्या चेह-यावर पडल्यावर;
ठळकपणे प्रथमच दिसल्या
तुझ्या कपाळात रूतलेल्या आठयांच्या रेघा.
आताशा वाटतात तुझे डोळे थकल्यागत;
जाणवतो वेग मंदावताना पाऊलं टाकताना;
तुझ्या चेहऱ्यावरील घामाच्या र॓षा
खूप काही बोलून जातात.
सोसतच राहिलास तुझं दुःख निमूटपणे एकटाच;
पण वेदनेला मात्र कधीही प्रकट केलं नाहीच कुठेच;
तू अथक प्रयत्नातून जपलंस आम्हाला
पण प्रदर्शन नाही केलंस तुझ्या उपकारांचं.
अदीम मानवी जडणघडणीतून उत्क्रांत
झालेलं अजब रसायन आहेस तू;
नेहमीच तू पचवलंस कठोरपणे अनेक युगांचं
कष्टदायक कौटुंबिक कर्तेपण.
तू गर्जून भेदलंस आकाश कधी
तर कधी जपलंस आकाशाचं अतक्यॆ अमर्यादपण;
तळपलास कधी तळपत्या तलवारीगत तर
कधी बनलास अभेद्य ढाल संकटात.
आमच्या गरजा भागवताना दिलंस भरभरून सारंच;
पण तू मात्र रिताच राहिलास आभाळागत;
मागे वळून पाहिलं नाहीस कधीच
नाही जमला तुला व्यवहार्य अचूक शहाणपणा.
चुकलेही असतील तुझे आयुष्याचे अडाखे;
कित्येकदा हरलाही असशील जगरहाटीनुसार;
पण जरी सारं जग फितुर झालं
तरी तू विखुरलं तुझं बापपण प्रत्येकासाठी.
तेव्हा थोडंसं आकाशही थरारलं असेल;
आणि आकाशातला बापही बरसला असेल-
आकाश कोनाड्यात एकटाच
- एक बाप म्हणून...
No comments:
Post a Comment