सत्यमूल्ये विखरत बसलो आहोत आपण
युगानुयुगे पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात।।।
या आशेने की कुणी विरळा पांथस्थ थबकेल
नि उल्हासित होईल त्यांच्या प्रखर सत्-तेजाच्या दर्शनाने।।।
अवैयक्तिक वर्धन आणि वैचारिक
परिवर्तनाची नांदी ठरणारे आपण सर्व।
मुक्तीची नीतिसूत्रे गात फिरताहोत
जगभर वैश्विक प्रेरणा बनून।।।
आपण स्वार्थकेंद्रित जगरहाटीला पुरून उरू
हा आपला आत्मविश्वास कदापिही न ढळणारा।
याची चाचपणी आपल्या ह्रदयाच्या गाभ्यात चालू
झाली असावी युगारंभापासूनच ।।।
आपण कोरडे नि शुष्क नाही बनलो काटेरी मार्गावर
चालताना।
कधीही ह्रदयातील सखोल झरे नाही आटून गेले दुष्कर
रस्त्यावरून प्रवास करताना।।।
स्वत:त जलद योग्य बदल करणे हीच प्रथमतः
शहाणपणाची खूण आहे ।
आपणास याची जाणीव होती ती गतीने बदलणा-या
या अनंत ब्रह्मांडात।।।
अ-मनात शब्दातीत शांतता सर्वव्यापी, बाह्य आवाजाची
व्याप्ती ओलांडणारी।
मनातील कोलाहल आणि अस्वस्थता अंतिमतः
शुन्यात विलीन होणारी।।।
पाय थकतात ते मुळीच समजत नाही मार्गक्रमण
करता करता।
पण जेव्हा कठीण उच्चतम ध्येय पायाशी लोळण घेते,
तेव्हा मिळणारे समाधान अवघा विश्व विस्तार कवेत घेते।।।
No comments:
Post a Comment