जीवन-वृक्षांची पाळंमुळं आताशा
खूप खोल रूजली आहेत।।।
जमीनीची ओल धरून तरारत
आली आहेत ही हिरवाकच्च झाडं।।।
त्यांवर बसतात निरनिराळ्या रंगाचे नि
अतर्क्य आवाजांचे गूढ पक्षी।।।
मी शोधतोय नानाविध जीवनरंग
नि शिकतोय पक्ष्यांची अनाकलनीय भाषा ।।।
या झाडांवरून विहरत आकाशाला गवसणी
घालणारी पाखरं विरळी।।।
त्यांची व्यापकता तोडते कक्षा
मर्यादित परिघाच्या।।।
तीही गाणी गातात आपल्याच
धुंदीत-जीवनमृत्यू गीते।।।
विखुरतात आनंद सर्वत्र
सहस्र रश्मी प्रमाणे।।।
ही पक्ष्यांची प्रेमगीते उधळतात सर्वत्र
जीवनतत्वे स्नेहाने रसरसणारी।।।
हीच धैर्यगीते देतात निर्भीडपणे
मृत्यूच्या डोळ्याला डोळा बेदरकारपणे ।।।
हे पक्षी प्राशन करत प्रमोदरस पसरवतात
दाही दिशांत आल्हाद।।।
मरणाला कवटाळून जीवनाला
अर्थपूर्ण बनवतात।।।
भेडसावत नाही त्यांना निरभ्र
आकाशाची अतीव उंची।।।
कारण अनंत आकाशच त्याच्या
पंखांना उडण्याचे बळ देते।।।
ही पाखरं घाबरत नाहीत
आकाशातील सहस्रआयामांना।।।
उलट एकरूप होतात ते त्या गडद
निळ्या जलाकाशाशी।।।
ही चिमणी पाखरंच बनतात मध्यबिंदू
-मनोआकाश नि जीवन वृक्षांतला।।।
आणि विस्तारत जातो त्यांचा कोलाहल सर्वदूर ओलांडत
अनेक आकाश, अवकाश नि आकाशगंगा अव्याहतपणे।।।
No comments:
Post a Comment