कसे काय कळते तुला माझ्या मनातले
हे गूढ उलगडत नाही मला कधीच
तू वाचतेस मला एखादया पुस्तकासारखे
कधी मुडपतेस मनाचे पान खूण म्हणून
तुझ्या विचारांचे तरंग उठत राहतात
खोल मनाच्या डोहात सतत
क्षणोक्षणी जाणवत राहतो स्व-संवाद
साधताना मौन स्वतःच्या अंतरतमात
उधळताना श्वास एकानंतर एक
मिळतोच विसावा तुझ्या आठवणींमुळे
सहवास लाभतो तुझा मखमली तसे
ह्दयाला परिसस्पर्श होत दाटतात प्रेमाचे आवेग
जरी असतो काळाचा एखादा उभा कातळ
तुझ्या माझ्या दरम्यान उभा ठाकलेला
तरी ऐकमेकांपलिकडे असणारे स्वयंभू असतेपण
तोडत जाते आपल्या क्षुद्र व्यक्तित्वाच्या आसक्त शृंखला
जेव्हा आपण दोघेही मनाच्या दुर्धर
स्वनिर्मित चौकटी मोडायला निघतो
तेव्हा आपणच अनपेक्षितपणे
बनत जातो निराकार आकाश, व्यापत अवघे अस्तित्व !
आपणा दोघांनाही आश्चर्य वाटतच राहते
आपल्या स्वयंभूपणातून कधी आणि कसा फोफावला
हा आभाळपणा कवेत घेणारा अनंतमितीचा वटवृक्ष
जीवनाच्या अस्तित्व बीजातून!!!
No comments:
Post a Comment