सर्वच कसं कधी नवं तितकच अनोळखी भासत राहातं!
त्यातूनआपली नवी पायवाट निर्माण करण्यासाठीच
पायपीट करत रहावी लागते प्रत्येकाला!
तरीही तारणारं प्रबळ मन क्षीण शरीरापेक्षा ताकदवान ठरतं!!!
पाय अडखळत राहतात सतत
अजाण रस्त्यांवरून ठेचकाळत जाताना!
आणि तरीही आपण प्रकाशदिशा पकडून
चालत राहावं अंतिम ध्येय-ध्यासाच्या पूर्णत्वापर्यत!!!
सर्व संपणार हे माहीत असूनही
आपण कचकड्यांचा बेगडी खेळ चालूच ठेवतो!
कधी मृत्यू जवळ येऊन ठेपलाय
हे नाहीच कळत मुळी आपल्याला!!!
आयुष्याचा लेखा-जोखा खुणावत राहतो चढ उतार !
भूतकाळातल्या आठवणींच्या सावल्या फेर धरून नाचंत
राहतात तन-मनाच्या पिंजऱ्या भोवती!!!
क्षणीक वर्तमान पार्याप्रमाणे उडून जातो!
भविष्यातील योजना कित्येक योजने दूर भासत राहतात!!!
सुख दुःखाचं क्षणभंगुरत्व वेदनेच्या अनुभूतीनं जाणलं की
माझं-तुझंचा भेद गळून पडतो!
आयुष्याचं घटना सार, क्रम नि कारण जरा जरा थोडसं उमजू
लागतं!
तरीही गूढ अतर्क्य जीवन सतत अथकपणे प्रवाही रहातं
सर्वांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत आणि नंतरही कदाचित!!!
जशी वाऱ्याची झुळूक सहज नि अनपेक्षित यावी
तसे ज्ञान उपलब्ध होते निरपेक्षपणे!
आणि मग सुरू होतो आपला खरा नवीन जन्म
बदलाची नांदी स्विकारत पुढे जाणारा स्वयंभू!!!
स्वकेंद्रित अवस्थेतून उन्नयनाकडे रुपांतरीत होताना प्रवास
चालूच राहतो पूर्णत्वाकडे नेणारा!
या उन्नत मार्गावर अथकपणे चालताना आपणही वेगाने
मार्गक्रमण करतो मृत्यूच्या अंधार-भूयारातून जीवनाच्या
तेजस्वी सहस्त्रसूर्याकडे !!!
No comments:
Post a Comment