पहिला मराठी शब्द शिकलो
तो म्हणजे "आई"
आयुष्यात पहिली गुरू कोण
ती म्हणजे "आई"
मी या जगात प्रथमच श्वास घेतला
आणि रडून आकांत केला
तेव्हा सर्वांत जास्त आनंद
तुलाच झाला
तुझ्या बोटाला धरून
मी चालायचं शिकलो
त्यापूर्वी कितीदा पडलो
तेव्हा तूच आधार बनलीस
निरपेक्ष प्रेमाची परिसीमा तू
अथवा प्रेमाचे अनंत आकाश तू
हे कळलेच नव्हते मला
जाण येईपर्यंत
पण जसा पोटातून जन्म दिलास
तशाच चुकाही पोटात घालून घेतल्यास
जगात नातीही बदलली कित्येक
पण नात्यांना अर्थ खरंच तूच दिलास
आजूबाजूची माणसं जेव्हा
दिशाभूल करत होती
तेव्हा तूच धीर दिलास
जाण दिलीस त्यांच्या कोतेपणाची
नीतिमूल्ये पुस्तकांचे धन नसावे
ती जगण्याची नींव असावी
आपण चांगल्याची कास धरावी
हे कृतीतून तूच शिकविलेस
काळ प्रत्येकाचे प्राक्तन न सुटणाऱ्या
गणिताच्या क्लिष्ट गुंत्यागत वाढवतोच
पण त्यावर प्रेम हेच सांत्वन असते
हे तूच शिकविले
जवळ भासणारे मित्र जेव्हा फितूर झाले
सर्वांनी कठीण प्रसंगात भरच घातली
तेव्हा केवळ एकाच व्यक्तिसमोर
अश्रूंनी डोळे ओथंबले ती म्हणजे तूच
जेव्हा स्वकर्तृत्वावर जग जिंकले
तो आनंद संयमाने घ्यायला शिकवलेस
जेव्हा समुद्र हातून शेवटच्या क्षणी निसटला
तेव्हा तुझ्यातील प्रेमसागराने ओथंबून टाकलेस
आजूबाजूचा प्रत्येकजण स्वार्थाने मलिन झाला
तेव्हा निस्वार्थतेचे धड़े तूच दिलेस
जेव्हा सामर्थ्याच्या कक्षा आकुंचित झाल्या
त्या सहजपणे ओलांडण्याची ताकद तूच दिलीस
जेव्हा सर्व जग अंधःकारमय होते तेव्हा
जगण्याचे तेज अगणित सूर्यांनी दिपवून
टाकण्याची प्रतिभा बाणवण्याचा निर्धार दिलास
क्षणभरात सर्वत्र लखलखता प्रकाश कधी भरला
ते कळलेच नाही खरोखरीच!!!
प्रत्येक सरत्या श्वासागणिक
अधिकाधिक आनंद
आयुष्यात पेरण्याचा
मंत्र तूच दिलास
आधी कळलेच नाही तुझे आशिर्वादच
लक्षावधी आयामात बरसत आहेत
नि तू शरीरात ओतलेला श्वास प्राण बनून
सोबत आहेच शेवटच्या श्वासापर्यंत-
जीवनाचे अंतिम प्रेरणास्त्रोत बनून.....
No comments:
Post a Comment