सगळीकडे भारलेला अपार आनंद
न थांबवता येईल असा
त्यातच उत्कटतेनं तुटलेल्या चौकटी
प्रगाढ निरवतेत सामावणा~या
मी उन्मुक्तपणे विहरतो
विचारांच्या विश्वापलिकडे
प्रकटतात अचानकच काही मुक्त ओळी
कवितांच्या माझ्या ओठांवर
मी शोधतो ओळींच्या
रुढ अर्थापलिकडला अर्थ
नाकारतो नियमांच्या कुबड्या,
नि प्रेमापलिकडल्या स्वयंपूर्ण रिक्तपणात
स्वत:ला झोकुन देतो
व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
निर्गुणतेतले पैलू आकर्षतात मला
सर्व जाणल्या जावू शकणाऱ्या गोष्टी
बंधनाला कारणीभूत ठरतात हे जाणतो मी
नि सत्याची प्रकाशवाट चोखळतो
मला माहित आहे
येथे काहीच कोणासाठी थांबत नाही
मागे काही उरत नाही
तरीही कवितेची अस्फुट अर्धवट ओळ
अचानक ओठांवर रेंगाळते
आणि जाणवतो सगळीकडे
भारलेला अपार आनंद
न थांबवता येईल असा
No comments:
Post a Comment