किती दिवस सरले वा अजून किती उरले
याचा लेखाजोखा काेणास ठाऊक?
कितीदा आपण आपल्या पायांवर उभे ठाकलो।।।
कित्येकदा पडलो, धडपडलो आणि सावरलो।।।
बरेचदा ठेचकाळलो, बिचकलो आणि तरीही मार्गस्थ झालो।।।
कितीदा स्थीर झालो, कधी कधी भरकटलोच।।।
आपल्या क्षमतेप्रमाणे आपणही विस्तारलो।।।
आपलीच पाळंमुळं जास्तीत जास्त खोलवर रुजवली।।।
कधी आपल्याच हिमतीवर जग जिंकून घेतले।।।
तर कधी आलेले अपयश निमूटपणे स्विकारले।।।
स्वार्थी आणि क्रूर माणसे काळाच्या ओघात नाहिशी झाली।।।
प्रेमळ आणि निरलस माणसं ह्रद्य आठवणी पेरून गेली।।।
कधी पुराने वेढावे तसे चहूबाजूंनी दुःखाने घेरले।।।
संकटं आली आणि शहाणंसुरतं करून निघून गेली।।।
आपणच आपला बोथटपणा स्विकारला।।।
कधी आपल्याच भावनांचा पोरखेळ केला।।।
बरेचदा इतरांची उणीदुणी काढत राहिलो।।।
इतरांच्या उखळ्या-पाखळया काढत राहिलो।।।
तरीही काहींना भरभरून दिले।।।
काहींना मदतीचा हात दिला।।।
कधी दु:खाच्या खोल गर्तेतून कसेबसे बाहेर पडलो।।।
आणि आपणच आपल्या जीवनाचा दुस्तर घाट पार केला।।।
तरी अनपेक्षितपणे काही सोबती मिळाले, काही विखुरले।।।
काही निरपेक्ष नाती जुळली, काहीची गुंतागुंत कधीही सुटली
नाही।।।
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मागोवा घेत पुढे जात
राहिलो।।।
तरीही काही इच्छा अपूर्णच राहिल्या कालौघात।।।
तरीही कधी मिळालेच भरभरून जीवनाच्या शिदोरी प्रमाणे
पुरणारे।।।
आपणही वाटचाल करत राहिलो तक्रार न करता।।।
पण कधी कळलेच नाही जीवनाचा शेवट कधी येवून ठेपला।।।
मी चाचपडतोच आहे कुठे गेला अनपेक्षितपणे
वेगाने निसटून गेलेला काळाचा
छोटासा तुकडा ज्याचे नाव आहे-जीवन।।।
No comments:
Post a Comment