Monday, February 12, 2024

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता    

आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।।

बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन, 

तारूण्य, वार्धक्य असा प्रत्येकाचा प्रवास चालू राहतो।।।


काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे                                

नि निसटले क्षण हुरहुर लावून जातात।।।

अस्थिरता आणि गती जणू सर्वांना आपल्या   

गर्तेत खेचत अस्वस्थ करतात।।।


मिळत नाही आपणांस हवे होते                                        

ते हवे होते तेव्हा।।।

कर्म आणि अर्थार्जन यांचा ताळमेळ                            

बसत नाही बरेचदा।।।


आवड आणि निवड यांची सांगड घालण्यात                   

आख्खं आयुष्य वेचलं तरी कमीच पडतं।।।

पोटाची खळगी भरता भरता आपल्या 

शक्यतांचा विस्तार लोप पावतो।।।


अनेक मैलाचे दगड  आपल्याला आपल्या                   

प्रवासात उपलब्ध होतात।।।

अस्थिरतेकडून स्थैर्याकडे वाटचाल करताना 

विविध आव्हाने पेलत पोलादाहून कणखर बनावे लागते।।


असेही कधी होते की निसर्ग आपल्या मार्फत 

उच्चतम कार्य लीलया पार पाडते।।।

आपल्या असाधारण क्षमतांचा परिपूर्ण विकास 

करणे हे मात्र आपल्याच अखत्यारीत असते।।।


तरी नानाविध अपेक्षांचे बाळगलेले ओझे अलगदपणे 

बाजूला ठेवताना हलके नि ताजेतवाने वाटू लागते।।।

जर अतिशय उंची वर उड्डाण करावयाचे तर 

अनावश्यक वजन वागवायचे नसते।।।


फूल सहजपणे आत्ममग्न असते आणि रंग 

आणि सुगंध यांची आसमंतात उधळण करते।।।

तितक्या सहजतेने आपण स्वेच्छेने सत् गुण जपावेत 

आणि कार्य सुगंधाने सर्वांना प्रभावित करावे।।।


ओळखावे आपले ध्येय नि करावा त्याचा 

विस्तार सर्वांच्या कल्याणासाठी।।।                          

निस्पृहपणे करावी वाटचाल 

सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी।।।

करोनाचं निमित्त

 

करोनाचा धक्का पचवताना

अनेक गोष्टींचा मागोवा घेतला गेला।।।

गतकाळात अचानकंच डोकावता आलं।।।

जीवनाला सकारात्मकतेची जोड देता आली।।।


वेळ आणि काळ याचा ताळमेळ जुळू  लागला।।।

आपणच आपल्यांच मायेच्या माणसांशी, 

मित्रमैत्रीण यांच्याशी संवाद नव्याने साधला।।।

एकांत आणि एकटेपणा यांत लक्ष्मण रेषा आखता आली।।।


पं.कुमार गंधर्वांचं निर्गुणी संगीतातील                                

"उड जाएगा हंस अकेला" एेकत मुशाफिरी केली।।।

अभिषेकीबुवांच्या " हे सुरांनो चंद्र व्हा"  या स्वरांमध्ये 

नखशिखांतपणे चिंब भिजलो।।।


किशोरीताईंच्या आवाजातील "जाणे अज मी अजर"             

या ज्ञानोबा माऊलींच्या शब्दामृतात न्हाऊन निघालो।।।

लताजींनीच गावं अशा "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" मध्ये 

स्मिता आणि गिरीश कर्नाड यांनी जी आर्तता 

होती ती  जिवंतपणे उभी केली।।।


आशाताईंच्या "माझिया मना जरा थांब ना" 

म्हणत स्वतःलाच थांबायची आळवणी केली।।।

मुकेश, रफी, तलत, किशोरच्या सेंटीमेंटल 

गाण्यांत तल्लीन होत स्वतः ला विसरलो।।।


कधी मोत्झार्ट, बाख , केनी जी यांच्या 

संगीतात आकंठ बुडालो।।।

टागोरांच्या "गीतांजली" आणि 

वाॅल्ट व्हिटमनची "तृणपर्णे" यांनी 

चौकटी मोडत नवीन आयामांना साद घातली।।।


कुसुमाग्रज, गुलजार, पाडगावकर आणि ग्रेस यांच्या 

काव्यप्रतिभेने भारावून गेलो।।।

शांता शेळके ह्यांच्या हायकू आनंद देऊन गेल्या।।।

अमृता प्रीतम,गौरी,विद्याताई, कविताताई 

यांची बंडखोरी धीर नि ताकद देऊन गेली।।।


करोनाचा धक्का पचवताना अनेक 

गोष्टींचा मागोवा घेता आला।।।

भूतकाळात एक कटाक्ष टाकता आला।।।

करोनाचं निमित्त मला उन्नत नि समृद्ध करून गेलं।।।

पूर्णत्व


कविताताई -ह्रदयात काव्य घेऊन अवतरलीस तू.

आयुष्याचा सारीपाटही मांडलासंच की. 

चार चौघात उठबस तुझीही होती गतीप्रमाणे,

मात्र माणुसणं जपण्याचं गमक जणू तूच ओळखलंस.


किती ती समंजसपणाची खूणगाठ बांधलीस कायमच,

कुठून गं तू बांधलीस एवढी असाधारण हिम्मत.

तू होतीस किती निर्भिड नि धीरोदात्त नेहमीच,

तूझे लिखाण होते परखड नि सुस्पष्ट सतत.


स्वयंभू नि अथांग विस्तार होता तुझा,

अनंत आयामात उजळत प्रकटलीस तू.

एकटीच किती अफाट बरसलीस तू साहित्य आवेगात,

पाझरलेस सातत्याने अगणित शब्द-लेखाचे झरे.


किती संपन्न नि निष्णात होतीस तू शब्दसंपत्तीने.

शब्दसागराला कह्यात ठेवायचीस लीलया तू.

त्यांना एकटीच आदेश द्यायचीस ना हूकूमाने 

तेव्हा भिरभिरत येऊन बसायचे शब्द रांगेत कविता बनून.


सरसर मारायचीस तू रंगांचे अनेक फटकारे. 

उतरायचे उन्नत लक्षवेधी चित्र आपसुकच.

तू जगत होतीस किती गं सहजपणे.   

एखाद्या तूच निर्मित केलेल्या अगम्य शब्दचित्रांगत.


एक स्वाधीन केंद्र होतीस तू-

अनेक वादळी झंझावातांचे.

पण किती सुंदर नि मुक्त-

संयमित व्यक्त व्हायचीस तू.


तू किती श्रीमंत होतीस मनाने नि वृत्तीने

सरस्वतीचा वरदहस्त होता तुझ्यावर,

आणि जमिनीवर कणखरपणे पाय रोवूनही 

आकाशाची उत्तुंगता पार केलीस तू.


तुझं नसणं सोसणं असह्यच होऊन गेलंय गं,

कितीदा गं रितं होत रहायचं आता.

आमच्या आटलेल्या आंतरिक झ-यांना आता

कोण ओतप्रोत भरेल प्रेमसागराने.


कसा क्षणभरात निरोप घेतलास गं,

एकदाही मागे वळून पाहिलं नाहीस.

किती गं अर्थपूर्ण नि अमोघ होतं तुझं वक्तृत्व,

नि आता निःशब्दतेच्या गर्तेत एकटेच टाकून गेलीस.


कविताताई, अनाहूतपणे शांतावलीस कायमची आता.

थोडं स्थिरावली असतीस की गं आता तरी पण 

थांबलीच नाहीस.

जरी अनंताचा प्रवास सुरू केलास निमूटपणे

सहस्त्र सूर्याला काळोखाची भिती नसतेच मुळी.


तू तुझ्या छोट्या आयुष्याच्या कॅनव्हासवर

जसे विविध पोतांचे नि आकारांचे विचार खरडले,

नानाविध प्रश्नांच्या लडी सोडवल्या अथवा ओलांडल्या

काही प्रश्नोत्तरं काळाच्या पडद्याआड गेली.


पण काही उत्तरांसाठी मात्र अजब रसायन असणारी तूच हवी 

होतीस, आ वासून उभं 

असणारं वास्तव तुझं नसणं  अधोरेखित करतंय, 

पण तुझं नसणं आमच्या असण्यात उरेल.


काही विचार नि लढे संपत नाहीत 

आणि ते इतरांच्या नसांतून वाहत राहतात

पूर्णत्वास जाई पर्यंत....

आग

 

दूरवर कुणीतरी सुरेल गीत गातंय

बासरीचा मंद सूर हवेत विरतोय


थंडगार वाऱ्यात नदी गारठतेय

रस्ता लांबच लांब वळणं घेत वाहतोय


आगीच्या लोळाप्रमाणं तू समोर उभीयेस

मी मात्र बर्फ़ागत गोठलोय


तरी मनातही आग आणि समोरही....

Saturday, February 3, 2024

अमूलाग्र बदल


सर्वत्र धुक्याची चादर आच्छादलेली

कितीही प्रयत्न केला तरी सर्व अंधुक

स्तब्ध आसमंतात घुमणारी शांतता

एका नव्या गूढ जगात नेणारी


मध्यरात्री सारे जग निद्रिस्त

मीच एकटा जागृत नि मौन

चांदण्यांची चादर ओढून

आकाश अथांगतेत आकंठ बुडालेले


थंड वारा मंदपणे वाहणारा 

हळूच धरतीवर धुक्याचे अस्तित्व चिरणारा

चंद्रप्रकाश सर्वदूर पसरणारा

दाही दिशा उजळवणारा


दुःखाचे अंधारी भूयार 

क्षणार्धात अंतर्धान पावणारे

समाधानाचे विस्तारीकरण

अंतरतमात वाढतच जाणारे 


रस्त्यावर गाड्यांची क्वचित चहलपहल

जणू काही अखंड निरवता क्षणार्धात कापणारी

रात्रभर पक्षी झाडांवर विसावलेले 

अवचितपणे साद घालत लक्ष वेधणारे


पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी जीवन प्रकाश

मनसृष्टीच्या कणाकणात रुजणारा सहजपणे

त्यातून निर्मित होतात प्रकाशगाणी

जी भेदतात आत्मधरेला आनंद किरणांनी


माझा प्रवास अव्याहतपणे चालणारा

श्वासागणिक पुढेच सरकणारा

मार्गक्रमणातील अडथळे सारत

आकाशाला गवसणी घालणारा 


तम ते प्रकाश हा तसा कठीण प्रवास 

पण आपणात अमूलाग्र बदल घडवणारा

नव्याने जीवनास परिपूर्ण करणारा

ह्रदय केंद्रात परिवर्तन आणणारा


आठवणींची साठवण!!!

 

आठवणी केवळ साठवता 

येतात मनात खोलवर 

सरत नाहीत त्या- खरं तर 

वाढतच जातात काळागणिक!    


कधी आठवणी बहरतात 

मधुमालतीच्या झुंबरांप्रमाणे  

उजळतात त्या मनातल्या 

मनात फुलत फुलत पुष्कळ


कधी आठवांच्या फुलांचे 

झुबके डवरतात अवचित

पळसाच्या तेजाळलेल्या केशरी 

गुच्छांगत लखलखणारे


येतात आठवणी पांढ-याशुभ्र बुचाच्या 

विलग फुलांगत- मोहक पण मनवेधी

तरी काही महकलेल्या क्षणांपासून 

दुरावा जाणवतो सुटून गेलेल्या 

कातर नात्यांचा कायमचा


आठवणी येतात दरवळत कधी 

रातराणीच्या सुगंधाप्रमाणे- मंद पण अल्हाददायक

मनाला स्पर्शून जातो त्यांचा रेंगाळणारा परीमळ 

-हदयात पसरत मैत्रीगत सुखावणारा


मंद वा-याच्या लकेरींवर हळुवार 

स्वार होऊन सुवासाप्रमाणे अलवार 

हरवलेले आनंदक्षण उधाणत 

सुखावून जातात ऐकांतात


आठवणी कधी उमलतात जाईच्या 

कळ्यांप्रमाणे -कोमल नि नाजूक 

मन:पटलावर कोरत जातात 

बारीक नक्षी नक्षत्रांची


आठवणी ओघळतात 

प्राजक्ताच्या पहाटसड्यांगत

तर कधी थबकतात त्या केशरी देठ 

नि सफेद पाकळ्यांवर जडलेल्या मूकप्रेमाप्रमाणे 


कधी आठवणीचा गुलमोहर 

बनतो दाहक

हृदयातील ज्वालांचे 

तांडव आगीने शमवतो


कधी आठवणी तेवतात मनात 

प्रकाशमान दिव्याप्रमाणे उज्ज्वल

पेटत्या पलित्यांप्रमाणे 

प्रकाशजाणीवा समृद्ध करतात 


आठवणी सहस्ररश्मींप्रमाणे 

उजळ करतात अंतःकरण

अंधारलेल्या मनात निर्मितात 

अनंत आवर्तने तेजोमय


आठवणी पेरत जातात परत परत 

जगलेले उदात्त क्षण

पुन्हा कधी उर्जित काळात 

आपण विसावतो ते कळतच नाही


आठवणी केवळ साठवता 

येतात मनात खोलवर 

सरतच नाहीत त्या, खरं तर वाढतच जातात 

काळागणिक सतत।

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...