Friday, December 15, 2023

कोण जाणे...

बासरीचा सुरेल आवाज मी

साठवतो ह्र्दयाच्या गाभ्यात

आणि दूर क्षितीजावर

झिळमिळतो संधिप्रकाश


रात्र उमलते

चांदण्यांच्या फुलांची उधळण करते

आकाश उजळते

त्यांच्या  किणकिणीने


सारी पृथ्वी लोप पावते

काळाचे गतिमान चक्र विसावते

मुसळधार पाऊस धुवून काढतो झाडं

जी डवरतात काळोखात मूकपणे


नदी दुथडी भरून

नागमोडी वळणांतून मार्गस्थ होते

नि पाणी जमिनीला सुपीक बनवते

पुढे पुढे जात राहते


या भिनलेल्या आसमंतात

मी ही अचानक लुप्त होतो

का कोण जाणे मग मला कसचीच 

आठवण नाही बोचत

-अगदी तुझी सुद्धा


तुझा मार्ग


तुला माझ्यासोबत चलायचे आहे का?

अनेक रस्ते मोकळे असतात चालण्यापूर्वी

पण एकदा पाऊल पुढे टाकल्यावर

पुन्हा मागे फिरता येत नाही

सोबत करतात फक्त आठवणी


तुझ्या बरोबरचा कोणताही मार्ग

चालायची माझी तयारी आहे-

काटेरी असो किंवा राजमार्ग

माझ्या काहीही अटी नाहीत

या पूर्वीही माझे पाय रक्ताळून बरे झालेत


फुलांनाही कोमेजावं लागतं कधी न कधी

हे काय ठाऊक नाही तुला?

तसेच आपलेही श्वास थोडकेच ना?

आजचं मरण उद्यावर एवढेच

ते तरी सुसह्य करुया ना


प्रकाश अस्तित्वात आहे म्हणजेच

अंधाराचे न असणे होय

तसेच प्रेमाचे अस्तित्व असणे म्हणजेच

दुःखाचे न असणे होय

म्हणून आजच ठरव "तुझा मार्ग"

"माझ्यासकट" वा" माझ्याविना"

निर्मिती



कधी कविता माझ्याकडे येते

आपसूक येणा~या श्रावणसरींगत

तर कधी स्वाधीन मृदगंधाप्रमाणे उधळत

नि उजळून टाकते ओसाड मनाचे उंबरठे

लख्ख प्रकाशकिरणांगत


कधी कविता माझ्याकडे येते

मनोमय लकेरींच्या प्रसन्न आचरणागत

तर कधी उफाळत्या सागरलाटांच्या आव्हानाप्रमाणे

नि व्यापून टाकते माझ्या व्यक्तित्वाला

जसे आकाश धरेला


कधी कविता माझ्याकडे येते

नाचत थिरकत गिरक्या घेत

तर कधी प्रखर उन्हातील सावलीगत

किंवा प्राण ओतते काजळलेल्या जीवनज्योतीत

जसे पूर्ण चंद्र ओततो अमृत आसमंतात


"प्रिये" कधी हीच कविता

तुझ्यागत माझ्याकडे येते

जीवनविनाशी वादळ बनून

नि उखडून टाकते सर्व निर्मिलेल्या

कलाकृती क्षणार्धात



देवून जाते उरलेले निर्गुणी श्वास-

आठवणी जपण्यासाठी

कोण जाणे माझ्यापुरती

ती नकळत एक प्रगल्भ सुरुवात असू शकते

बावनकशी सोनसळी कवितेच्या निर्मितेची

काळ।।।


काही वेळा आपण भविष्याचा विचार 

करता करता  मनात घोळणाऱ्या

नकारात्मक प्रभावाला

कमी करण्याचा प्रयत्न करतो।।। 



कधी जाणवत राहतात भूतकाळातील 

घटनांचे पडसाद कधी अंगावर

शहारे आणणारे तर कधी बेफाम 

वेगाने आयुष्याला सर्व बाजूंनी वेढणारे।।। 



वीजेच्या वेगाने येतो वर्तमान 

अनेक प्रकारची आव्हाने  घेऊन एकाच वेळी 

आणि आपण मोठ्या हिमतीने झेलतो 

त्यांना निधड्या छातीवर क्षणोक्षणी।।। 



आपण होतो कणखर कालपरत्वे आणि 

साहतो शरीरावरील जखमांचे खोल व्रण  

मनावर अचानक झालेले तीव्र आघात

झेलता झेलता।।। 



शोध घेत असताना नाही सापडत काळाच्या 

नागदंशावरचे परीणाम कारक उतारे।।। 

आपण चालत राहतो खडतर वाट

खडे टोचत राहतात पावलागणिक।।। 


भूत, वर्तमान आणि भविष्याचे  क्षणमणी 

काळाच्या  दोऱ्यात  ओवलेले- तुटतात नि कोसळतात 

एका मागोमाग एक तत्परतेने।।। 

जशी प्राचीन किल्ल्याची  बुरूज वा तटबंदी 

अचानक ढासळत रहावी सतत तशीच 

प्रयत्नपूर्वकही न थांबवता येणारी।।। 



आपण कदाचित शोधत राहतो 

आयुष्याची विविधांगी अर्थपूर्णता-

अपूर्णत्वात समाहित झालेली।।। 



तरी मागे उरतो फक्त वेडावाकडा 

ढाचा उलटापालटा तुटलेला-

क्षणभंगुर काळाचा।।। 


मानवाची असीम ताकद निष्प्रभ ठरते

निसर्गाच्या अनंत आयामांना मुठीत ठेवण्यासाठी।।।

मृत्यू आ वासून उभा असतो

प्रत्येकासाठी निश्चितपणे कालौघात।।। 

आज नाही तर उद्या-

तुझ्यासाठी वा माझ्यासाठी-काळ बनून।।।

स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवा!!!


चला आपल्या जीवन-नौकेचे सुकाणू 

आपल्या शक्तिशाली हातात घेऊया. 

त्यांच्या असहकारासाठी इतरांना दोष देऊ नका.

स्वत:ची मर्यादा तोडून अमर्याद 

आकाशात उंच भरारी घ्या. 


जेव्हा तुम्ही विस्तारणारे निळे 

आकाश बनणे निवडू शकता, 

तेव्हा लहान अस्पष्ट ढग बनू नका. 

जेव्हा तुम्ही तेजस्वी सूर्य बनू शकता, 

तेव्हा सर्वव्यापी वाऱ्याची भीती बाळगू नका.


जेव्हा तुम्ही अद्भुत चंद्र बनू शकता,

तेव्हा तुरळकपणे चमकणारा तारा बनू नका. 

जेव्हा तुम्ही विलक्षण पृथ्वी बनू शकता,

तेव्हा रखरखीत पठार बनू नका. 

जेव्हा तुम्ही गर्जना करणारा समुद्र बनू शकता, 

तेव्हा लहान लाटा बनू नका. 


जेव्हा तुम्ही एक अमर्याद विश्व बनू शकता, 

तेव्हा एक लहान सूक्ष्म जग बनू नका. 

जेव्हा तुम्ही दयाळू होऊ शकता, 

तेव्हा स्वकेंद्रित अहंकारी होऊ नका. 


हे सर्व जाणीवपूर्वक निवड, ठोस निर्णय 

आणि सर्वोत्तम अंमलबजावणीबद्दल आहे. 

जेव्हा तुम्ही स्वत: तयार केलेला उंबरठा 

एकदा ओलांडू शकता, 

तेव्हा तुम्ही जुन्या मनाच्या तावडीतून 

कधीही स्वतःला बाहेर काढायला शिकू शकता.


मन स्वतःच्या मर्यादा निर्माण करते, 

सजगतेने ते स्वतःच्या मर्यादा मोडू शकते. 

स्वतःवर विश्वास ठेवा.

व्यापक ज्ञान घेऊन स्वतःमध्ये 

संपूर्ण परिवर्तन घडवून आणूया.


विचारांनी स्वतः तयार केलेल्या 

अरुंद चौकटींच्या पलीकडे जा. 

वर्तमानात असण्याचा अमर्याद आनंद घ्या. 

एकदा स्वातंत्र्याची चव चाखा!

मग आपण ते नेहमी पुन्हा चाखू शकता. 


तुमची भव्य स्वप्ने निवडा आणि  त्यांचा पाठलाग करा. 

स्वातंत्र्याला आलिंगन देण्यासाठी 

फक्त आपले मनाचे विशाल पंख पसरवा.

वाटेत केवळ प्रमुख टप्पेच नव्हे 

तर प्रवासाचा आनंद घेऊया.


जीवन बहुआयामी आहे आणि प्रत्येकासाठी 

एक मोठा वाटा ठेवला आहे. 

संकुचिततेच्या पलीकडे जा!!! 

दुसऱ्यांना मदत करा!!!


आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवा !!! 

स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवा- 

इथे आणि आत्ता!!!

अंतरतमातील अवकाश


अरेरे! आजूबाजूला किती विराट अराजकता आहे!!!

तरीही प्रत्येक सुंदर मनाला प्रगाढ शांततेचीच ओढ आहे.

शारिरीक संवेदनांचा आधार घेत अनित्यता जाणणे 

म्हणजेच स्वतःत समूळ परिवर्तन करणे .


आपण ती प्रत्येक कृती विचारपूर्वक निवडावी

जी आपल्या हृदयाला नितांत शांत करते.

जेव्हा आपण अविचाराने घेरले जातो,

तेव्हा आपल्या विश्वासाच्या विलक्षण दृढ अशा आंतरिक 

आवाजातून अधिक निरवता र्निर्मित होऊ द्यावी.


मी मानवतेच्या दुःखमुक्ततेचे अस्तित्व साजरे करतो.

त्याने माझ्या अंतरतमात अमर्याद प्रेम उचंबळत राहते.

मला क्षणभरात आजूबाजूचे स्वार्थी जग 

आणि त्याच्या तीव्र वेदना यांचा विसर पडतो.

नि मी वर्तमान क्षणात स्वत:ला सृजनतेत झोकून देतो.


सर्वांसाठी प्रत्येक क्षणी शरीराचा नाश सुरू झाला आहे.

हे क्षणभंगूर शरीर म्हणजे प्रत्येकाला 

भाड्याने मिळालेले मर्यादित अस्तित्व आहे.

म्हणून कोणाशीही वा कशासाठीही असणारी आपली

आसक्ती अगदीच व्यर्थ आहे.


प्रीतीने ओथंबलेल्या सरलतेने आपल्या 

जुन्या क्लिष्ट स्वार्थी सवयींपासून मोकळे होऊ या.

आपण शरीर, मन आणि काळाचे गुलाम आहोत.

ते अडथळे ओलांडण्याचे धाडस करूयात.


उदयव्ययातून आलेली सखोल समजेची 

झलक आधी क्षणभर येऊ शकते.

नंतर सतत जागरूकतेने आणि मनाच्या 

समतेने ती दिर्घकाळ टिकते.


चला दयाळू आणि निःस्वार्थी होऊया.

मग आपण पलिकडच्या किनाऱ्यावर नक्कीच पोहोचू .

नि मग आपण तुलना आणि द्वैतात अडकणार नाहीत.

तेव्हाच ‘अ-मना’ मध्ये - अद्भुत तेजस्वी कमळ फुलेल.


पीसी: Google images आणि फेसबुक

कॉपीराइट ©2023, डॉ. अमित मेढेकर. सर्व हक्क राखीव.

तुझ्यामुळेच


रुजतंच नसतं मनांत काही

तू गातेस जीवनगीत

तेही ऱ्हदया पर्यंत पोचत नाही

तू हाक देतेस मोठ्याने

ती ही हवेतच विरून जाते


रुजतंच नसतं मनांत काही

तू खूप बोलत राहतेस

तेव्हा निशःब्द व्हायला होतं

तू खळाळून हसतेस

मी मौनच राहतो


रुजतंच नसतं मनांत काही

तू प्रेम उधळत जातेस

स्वतःसाठी काहीच मागत नाहीस 

परतफेड म्हणून- प्रेम सुद्धा

त्या माझ्या कोरडेपणावर मनातल्या

मनातच मीच कोरडे ओढतो


रुजतंच नसतं मनांत काही

तू म्हणजे जीवन चैतन्य असतेस

जणू खळाळता झरा

तू निरागसपणे पसरत जातेस

तुझ्या मनातील चंद्रप्रकाश

जेव्हा मी विझत जातो अंधाराप्रमाणे


रुजतंच नसतं मनांत काही

कारण जेव्हा तू शोधतेस

सर्जनशीलता म्हणजेच ओतप्रोत जीवन

तुला जाणवतो जीवनप्रकाश

मला जाणवते मृत्यूची गडद छाया


कदचित अनेक युगांनंतर

अचानकच रुजू पहातं मनांत काही तुझ्यामुळेच

तेव्हा क्षणार्धात प्रेमसत्य बीज रुजतं 

माझ्या ह्रदयात जीवनानंद नि मृत्यूदंशा पलिकडलं


नि तेव्हापासून मी चालतो अखंडपणे  

काल तीरा पलिकडे

नि सुरू रहातो जीवन-मृत्यू पलिकडील मुक्त-प्रवास

सत्य सूर्याच्या प्रकाशात तुझ्यामुळेच !!!

आठवणींचा कल्लोळ

आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता     आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन,  तारूण्य, वार्धक्य अस...